Rahul Gandhi on Mahakumbh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज संसदेत महाकुंभाच्या भव्य आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, गंगा नदीला पृथ्वीवर आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला गेला, हे आपणा सर्वांना माहीत आहे आणि तेच महाकुंभाच्या महान प्रयत्नात दिसून आले. मात्र दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या भाषणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निशाणा साधला. पंतप्रधान सभागृहात बोलणार होते, त्याची माहिती वेळेत दिली गेली नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला.
या संपूर्ण मुद्द्यावर विरोधकांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, हा कसला नवीन भारत? पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगारीबाबतही बोलायला हवे होते, मात्र ते यावर काहीही बोलले नाहीत. पंतप्रधान मोदींनी महाकुंभमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहायला हवी होती, पण त्यांनी तसे केले नाही.
संसद संकुलात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, कुंभ ही आपली परंपरा, इतिहास, संस्कृती आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्याबद्दल काहीही बोलले नाही, अशी आमची तक्रार आहे. कुंभला जाणाऱ्या तरुणांना पंतप्रधानांकडून रोजगार हवा आहे, पण पंतप्रधानांनी रोजगाराबाबत एक चकार काढला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
कुंभ हे देशाच्या सामूहिक चेतनेचे प्रतीक - PM मोदीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी संसदेत महाकुंभाच्या आयोजनाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी लाल किल्ल्यावरुन सर्वांच्या प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले होते. संपूर्ण जगाने महाकुंभाच्या रुपाने भारताची भव्यता पाहिली. हे सर्वांच्या प्रयत्नांचे खरे यश आहे. गेल्या वर्षी अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देश हजार वर्षांसाठी कसा तयार होत आहे, याची जाणीव झाली होती. बरोबर एक वर्षानंतर महाकुंभाने आपल्या सर्वांच्या या विचाराला आणखी बळ दिले. देशाची ही सामूहिक जाणीव देशाची ताकद दाखवते, असं मोदी यावेळी म्हणाले.