लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात प्रस्तावित बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाचा आराखडा निवासी आयुक्त आणि सचिव आर. विमला यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या प्रचारासाठी देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सांस्कृतिक भवन असायला हवे, अशी मागणी ‘लोकमत एडिटोरियल बोर्डा’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केली होती, हे येथे उल्लेखनीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसाचे देशाच्या राजधानीतील हक्काच्या सांस्कृतिक भवनाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. निवासी आयुक्त आर. विमला यांनी सांस्कृतिक भवनाचा आराखडा मुख्यमंत्र्यांना नुकताच सादर केला. बहुउद्देशीय सभागृह, यूपीएससीच्या मराठी उमेदवारांसाठी निवास व्यवस्था, प्रशस्त ग्रंथालय व अभ्यासिका तसेच अनुषंगिक सुविधा राहणार आहेत. महाराष्ट्र महोत्सवासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली.
पुस्तकाचे दुकान नाही...
‘लोकमत एडिटोरियल बोर्डा’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी दिल्लीत आयोजित ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी भाषेला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते. डॉ. दर्डा यांनी पुढच्या पिढीने मराठी बोलावी आणि त्यांचे मराठीशी नाते घट्ट व्हावे, यासाठी आपण काय करीत आहोत, असा प्रश्न उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील ३६ पैकी २० जिल्ह्यांत आणि विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांत पुस्तकाचे एकही दुकान नाही. ग्रंथालयांना वेळेवर अनुदान मिळत नाही. अशात, मराठी भाषा कशी वाढणार, असे कितीतरी मुद्दे महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून दिले होते. दिल्लीत सांस्कृतिक भवन होणे डॉ. दर्डा यांच्या प्रयत्नांचे यश होय, असे म्हणायला हरकत नाही.