विमान इंधनाच्या तुलनेत पेट्रोल महाग!
By Admin | Updated: January 21, 2015 23:55 IST2015-01-21T23:55:17+5:302015-01-21T23:55:17+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घट झाल्यानंतर आता विमानापासून रस्त्यावरील चारचाकी वाहनांपर्यंत सर्वच इंधनांच्या किमतीमध्ये घट झाली आहे.
विमान इंधनाच्या तुलनेत पेट्रोल महाग!
मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये विक्रमी घट झाल्यानंतर आता विमानापासून रस्त्यावरील चारचाकी वाहनांपर्यंत सर्वच इंधनांच्या किमतीमध्ये घट झाली आहे. मात्र, इंधनाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी कराच्या जंजाळामुळे प्रथमच विमान इंधनाच्या किमती (एअर टर्बाइन फ्युअल) या पेट्रोलच्या किमतीपेक्षा कमी झाल्या असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोलच्या किमती ५८ रुपये ९१ पैसे इतक्या आहेत. तर विमान इंधनाची प्रति लीटर किंमत ५२ रुपये ४२ पैसे इतकी आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमती त्या प्रमाणात कमी केल्या. मात्र, याच परिस्थितीचा फायदा वित्तीय तूट भरून काढण्याच्या दृष्टीने करून घेण्यासाठी केंद्र सरकारने सरत्या तीन महिन्यांत चार वेळा उत्पादन शुल्कात वाढ केली. गेल्या तीन महिन्यांत उत्पादन शुल्कात ७ रुपये ७५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे आता प्रति लीटर पेट्रोलकरिता १६ रुपये ९६ पैसे इतके उत्पादन शुल्क वसूल केले जाते.
सलग नऊवेळा पेट्रोलच्या किमतीत कपात झाल्यानंतर आता पेट्रोलचे दर हे १४ रुपये ६९ पैशांनी कमी झाले आहेत. उत्पादन शुल्कात झालेली वाढ ही ग्राहकांच्या खिशातून कंपन्या जरी वसूल करत नसल्या तरी, त्यात वाढ झाली नसती तर पेट्रोलच्या किमती आणखी नऊ रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या असत्या.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांत चार वेळा उत्पादन शुल्कात वाढ केल्याने त्या कराचे प्रमाणही लीटरमागे विक्रमी झाले आहे. (प्रतिनिधी)
४वाहनाच्या इंधनात सर्वाधिक शुद्ध इंधन हे विमानाकरिता वापरले जाते. विमान इंधनावर सध्या ८ टक्के उत्पादन शुल्क आकारले जाते. त्यात वाढ झालेली नाही.
४त्यामुळे सध्याच्या स्थितीत पेट्रोलच्या तुलनेत एटीएफच्या किमती प्रति लीटर तब्बल पाच-साडे पाच रुपयांनी कमी झाल्या आहेत.