नवी दिल्ली : देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग ११व्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल लिटरला ४७ पैसे, तर डिझेल ९३ पैशांनी महाग झाले आहे. विमानाच्या इंधनामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ करण्यात आली असून, यावेळी ही वाढ १६.३ टक्के आहे.सरकारी इंधन कंपन्यांनी दरामध्ये वाढ करण्याचा सपाटा कायम राखला आहे. विमानांसाठीचे इंधन एका किलोलिटरला ५४९४.५० रुपयांनी वाढले असून, आता त्याची किंमत ३९०६९.८७ रुपये प्रतिकिलोलिटर अशी झाली आहे. चालू महिन्यात या इंधनामध्ये झालेली ही सलग दुसरी वाढ आहे. याआधी १ जून रोजी या इंधनाच्या किमती ५६.५ टक्के इतकी मोठी वाढ करण्यात आली आहे.याआधी फेब्रुवारी महिन्यात सलग सातवेळा विमानाच्या इंधन दरामध्ये कपात करण्यात आली होती. त्यानंतर १ जून रोजी मोठी वाढ झाली आहे.पेट्रोल आणि डिझेलवर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने व्हॅट व अन्य कर आकारण्यात येत असल्याने इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षा ग्राहकांना अधिक रकमेने इंधन खरेदी करावे लागते.लॉकडाऊननंतर इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये दररोज बदल करण्यास प्रारंभ केला. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ४७ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ९३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. डिझेलच्या दरात झालेली ही वाढ सर्वाधिक आहे. गेल्या १० दिवसांत पेट्रोलच्या दरामध्ये ५.४७ पैसे, तर डिझेलच्या दरामध्ये ५.८० पैसे प्रतिलिटर अशी वाढ झाली आहे.
डिझेलच्या दरात ९३ पैसे वाढ; पेट्रोलही पेटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 01:13 IST