अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल
By Admin | Updated: June 2, 2014 06:05 IST2014-06-02T06:05:49+5:302014-06-02T06:05:49+5:30
ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले

अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल
नवी दिल्ली : ही निवडणूक जनतेच्या अपेक्षांची निवडणूक होती. अपेक्षापूर्ती केल्यास जनता डोक्यावर घेईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदाच भाजपाच्या मुख्यालयात आले. यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे भारतात पार पडलेली लोकसभा निवडणूक देशासाठीच नव्हेतर संपूर्ण जगासाठी २१ व्या शतकातील निर्णायक घटना असल्याचे सांगून भाजपा सरकारने सामान्य नागरिकांच्या हितासाठी निष्ठेने काम केल्यास देशातील जनता त्यांच्याशी कधीही नाते तोडणार नाही. देशातील जनता १९६७ मध्येच काँग्रेसमुक्त झाली होती. परंतु त्यानंतर झालेल्या प्रयोगाने निराश होऊन परत काँग्रेसकडे वळली, असेही मोदी म्हणाले. जनता आपल्यापेक्षा दहा पावले पुढे आहे. त्यांच्या बरोबरीने कसे चालावे, आपली वागणूक कशी असावी हे बघणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांचा आपल्याप्रती विश्वास वाढीस लागेल. यापूर्वीच्या निवडणुकीत राजकारणापेक्षा जातीय समीकरणाची चर्चा होत असे, परंतु ही पहिली निवडणूक आहे. ज्यामध्ये जातीय समीकरण, भौगौलिक समीकरण आणि इतर परंपरागत समीकरणांना दूर सारून जनतेने जनादेश दिला, असे ते म्हणाले. ही निवडणूक जनतेच्या अपेक्षेची होती. हीच प्रेरणा आणि अपेक्षा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला जोडत होती. त्यामुळे जनतेच्या अक्षेपांची पूर्ती करण्याची सरकार आणि भाजपाचे जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)