MP Minister Prahlad Patel: मध्य प्रदेशात रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याची देशभरात चर्चा आहे. मात्र आता मध्य प्रदेशच्या मंत्र्यांनी भिक्षेसंदर्भात केलेल्या एका विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. मध्य प्रदेशचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. लोकांना सरकारकडून भीक मागण्याची सवय लागली आहे, असे वादग्रस्त विधान प्रल्हाद पटेल यांनी केलं. प्रल्हाद पटेल यांच्या विधानावरुन विरोधकांनी टीका केली असता त्यांनी अजब स्पष्टीकरण देखील दिलं. मी माझ्या समाजातील लोकांना सल्ले देत होतो असं प्रल्हाद पटेल यांन म्हटलं.
मध्य प्रदेशातल्या राजगड जिल्ह्यातील सुथलिया येथे शूर राणी अवंतीबाई लोधी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला प्रल्हाद सिंह पटेल आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं. जेव्हा जेव्हा एखादा नेता भेटायला येतो तेव्हा त्याला पत्र दिले जाते, हे चुकीचे आहे. सरकारकडे भीक मागण्याची सवय लोकांना लागली आहे, असं प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले. या विधानावर विरोधी पक्ष काँग्रेस आक्रमक झाला असून पटेल कोणाला भिकारी म्हणत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे.
"आता लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागली आहे. कोणताही नेता आला की त्याला पत्रांनी भरलेली टोपली दिली जाते. हार घालतानाही पत्र दिले जाते. ही सवय चांगली नाही. घेण्याऐवजी देण्याची मानसिकता तयार करा. यामुळे मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हीही आनंदी व्हाल आणि एक सुसंस्कृत समाज निर्माण कराल. भिकाऱ्यांची ही फौज जमवणं...याने समाज मजबूत होत नाही. हे समाज कमकुवत करण्यासाठी आहे. फुकटच्या गोष्टींसाठी आकर्षित होणे म्हणजे शूर स्त्रियांचा आदर नाही," असं प्रल्हाद पटेल म्हणाले.
"अशा हुतात्म्याचे नाव कोणाला माहीत आहे का ज्याने कोणाकडे भीक मागितली आहे. कुठल्या हुतात्म्याने भिक मागितली असेल तर नाव सांगा. असे असूनही आपण येऊन आपला कार्यक्रम संपवून निघून जातो. मी फक्त एकच भिक्षा मागून माझे बोलणे संपवतो… मी नर्मदेच्या परिक्रमेचा रहिवासी आहे, म्हणून मी सुद्धा भिक्षा मागतो पण माझ्यासाठी कधीच नाही. प्रल्हाद पटेल यांना काही दिले असे कोणीही म्हणू शकत नाही," असंही प्रल्हाद पटेल म्हणाले.
प्रल्हाद पटेल यांचे स्पष्टीकरण
काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर मंत्री प्रल्हाद पटेल यांनी त्यांचे म्हणणं मांडले. माझ्या भाषणादरम्यान मी जे काही बोललो ते जनतेसाठी नव्हते, तर सामाजिक मेळाव्यासाठी होते. ती आपल्या समाजाची सभा असल्याने जनतेला भिकारी म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या कार्यक्रमात हे भाषण केले तो कार्यक्रम समाजाचा वैयक्तिक कार्यक्रम होता. ज्या स्टेजवर मी हे भाषण केले त्यावर काँग्रेसचे लोकही उपस्थित होते. माझा पक्ष आणि माझ्या नेतृत्वाला अडचणीत आणण्यासाठी जितू पटवारी प्रयत्न करत आहेत, असं स्पष्टीकरण प्रल्हाद पटेल यांनी दिलं.