मेट्रोत खाली बसलात तर लागणार दंड
By Admin | Updated: March 4, 2017 14:59 IST2017-03-04T14:59:28+5:302017-03-04T14:59:28+5:30
मेट्रोत प्रवास करताना खाली बसलेले आढळलात तर मेट्रो स्क्वॉड तुम्हाला खाली उतरवू शकतं

मेट्रोत खाली बसलात तर लागणार दंड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - मेट्रोमध्ये प्रवास करत असताना कधीतरी खूप दमलेले आहात आणि बसायला जागा नाही म्हणून जर खाली बसायची सवय तुम्हाला असेल तर ही सवय लगेच सोडून द्या. कारण मेट्रोत प्रवास करताना खाली बसलेले आढळलात तर मेट्रो स्क्वॉड तुम्हाला खाली उतरवू शकतं. इतकंच नाही कर तुम्हाला 200 रुपयांचा दंडही लागू शकतो. गर्दीच्या वेळी जेव्हा उभं राहायला जागा नसते तेव्हा अनेक जण खालीच बसतात. मात्र मेट्रोने ही सवय बदलण्याचं ठरवलं असून हा निर्णय घेतला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मेट्रो स्क्वॉडने मेट्रोत खाली बसलेल्या अनेक प्रवाशांना खाली उतरण्यास भाग पाडलं. स्क्वॉडने महिला डब्यात खाली बसलेल्या प्रवाशांना सुलतानपूर, अरजनगड, आणि गिटोरनी मेट्रो स्थानकावर ट्रेनमधून खाली उतरवलं. काही प्रवाशांकडून 200 रुपयांचा दंडही वसून करण्यात आला.
मेट्रो प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा स्क्वॉड आता खासकरुन आठवड्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या शेवटी तपासणी करणार. बाकीच्या दिवसांमध्ये ते फेरफटका मारताना दिसतील. गुरुवारी आणि शुक्रवारी मेट्रोत जास्त गर्दी असते. अशावेळी काही प्रवासी जर खाली बसले तर उभ्या असलेल्या प्रवाशांची असुविधा होता. बसल्याने जागाही जास्त जाते ज्यामुळे उभं राहायला मिळत नाही.
मेट्रोतून नेहमी प्रवास करणारे या कारवाईचं स्वागत करत आहेत. तर काही प्रवाशांचं म्हणणं आहे की जर कोणी व्यक्ती दमलेली असेल तर दिल्ली ते गुडगाव एक तासाचा प्रवास उभा राहून नाही करु शकत. अशावेळी खाली बसल्यास त्यात अयोग्य काय. काहीजण तर मेट्रोचे कोच आणि सीट वाढवण्याची मागणी करत आहेत.