आयआयटीयन्सना हवी पैशांपेक्षा मन:शांती
By Admin | Updated: December 5, 2014 04:04 IST2014-12-05T04:04:43+5:302014-12-05T04:04:43+5:30
कॅम्पस प्लेसमेंटवेळी मिळालेला प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्यांत तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. यात एका विद्यार्थी व विद्यार्थिनीने अन्य एका कंपनीचा सुमारे

आयआयटीयन्सना हवी पैशांपेक्षा मन:शांती
कानपूर : आयआयटी कानपूरच्या चार विद्यार्थ्यांनी परदेशी कंपनीने दिलेला एक-एक कोटी रुपयांच्या वार्षिक पगार असलेल्या नोकरीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आयआयटीच्या इतिहासात प्रथमच कोट्यवधीच्या नोकरीचा प्रस्ताव धुडकावून लावण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे.
कॅम्पस प्लेसमेंटवेळी मिळालेला प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्यांत तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. यात एका विद्यार्थी व विद्यार्थिनीने अन्य एका कंपनीचा सुमारे ५० लाख रुपयांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या विद्यार्थ्यांनी मानसिक शांततेसाठी कोट्यवधींचा हा प्रस्ताव धुडाकावून लावला आहे. येत्या काळात आणखी शिक्षण घेण्याची व संशोधन करण्याची या विद्यार्थ्यांची इच्छा आहे.
आयआयटीमध्ये गेल्या १ डिसेंबर रोजी प्लेसमेंट मोहीम सुरू झाली असून यासाठी १,३०० विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली होती. चार दिवसांत सुमारे ९० कंपन्यांनी यात सहभाग घेतला. सर्वाधिक एक कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव याच कंपनीने या चार विद्यार्थ्यांना दिला होता. विविध कंपन्यांनी आतापर्यंत ४९० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे वार्षिक वेतन ४० ते ५० लाख रुपयांनजीक आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत आयआयटी परिसरात चालणाऱ्या या मोहिमेत जवळपास २५० कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. यात देश-विदेशातील सर्व नामांकित कंपन्यांसोबतच सरकारी कंपन्यांचाही समावेश आहे.
> नकाराचा चौकार
आयआयटीच्या प्लेसमेंट सेलचे प्रमुख दीपू फिलीप यांनी आज सांगितले की, ‘आयआयटीत बुधवारी एका परदेशी कंपनीने बीटेक व बीटेक ड्युएलच्या चार विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये निवडले. चार विद्यार्थ्यांना एक लाख ५० हजार डॉलर म्हणजे, सुमारे ९३ लाख रुपयांचे वार्षिक (टेक होम सॅलरी) व अन्य सुविधांसह एक-एक कोटी रुपयांच्या पॅकेजवर नोकरीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या विद्यार्थ्यांनी कंपनीचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.’