पठाणकोट हल्ला, सलविंदर सिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होणार ?
By Admin | Updated: January 8, 2016 13:35 IST2016-01-08T13:33:06+5:302016-01-08T13:35:25+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे.

पठाणकोट हल्ला, सलविंदर सिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होणार ?
ऑनलाइन लोकमत
पठाणकोट, दि. ८ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) गुरुदासपूरचे पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांची पॉलिग्राफ चाचणी होण्याची शक्यता आहे. सलविंदर सिंह यांनी चौकशीमध्ये एनआयएला जी माहिती दिली त्यामध्ये विसंगती दिसत असल्याने नेमके सत्य शोधण्यासाठी एनआयएकडून त्यांची पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते.
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या सहा अतिरेक्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री सलविंदर सिंह आणि त्यांच्यासोबत असणा-या दोघांचे अपहरण करुन नंतर त्यांना सोडून दिले होते. ३१ डिसेंबरच्या रात्री सलविंदर सिंह पठाणकोट येथील गुरुव्दारामध्ये दर्शन घेऊन परतत असताना अतिरेक्यांनी त्यांच्या एसयूव्हीगाडीचे अपहरण केले होते.
पठाणकोट येथील गुरुव्दारामध्ये मी नियमित दर्शनाला जायचो असे सलविंदर यांनी चौकशीत सांगितले आहे. मात्र गुरुव्दाराची देखभाल करणा-या सोमराज याने ३१ डिसेंबरच्या रात्री पहिल्यांदाच मी सलविंदर यांना भेटलो असे सांगितले आहे. त्यामुळे नेमके तथ्य जाणून घेण्यासाठी सलविंदर यांची पॉलिग्राफ चाचणी होऊ शकते. दिल्ली किंवा बंगळुरु येथे त्यांना चाचणीसाठी नेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.