विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:02+5:302015-02-13T23:11:02+5:30
हायकोर्ट : जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देश

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा
ह यकोर्ट : जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देशनागपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या रखडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संघाची निवडणूक घेण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देश उपधर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. संघाच्या घटनेतील नियमानुसार आवश्यक कालावधीत निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक नागपुरात होणार आहे.संघाच्या कार्यकारी मंडळात २४ विविध पदाधिकारी व सदस्यांचा समावेश असून कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार वसंत खोटरे अध्यक्ष झाले होते. यानंतर अंतर्गत वादामुळे संघाची निवडणूकच झाली नाही. १८ एप्रिल २०१३ रोजी संघाच्या एका गटाने सभा घेऊन ५ मे २०१३ रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी खोटरे गटाने ४ मे २०१३ रोजी निवडणूक जाहीर केली. याविरुद्ध प्रतिस्पर्धी गटाने उपधर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. उपधर्मादाय आयुक्तांनी ही याचिका मंजूर करून ४ मे रोजीची निवडणूक अवैध ठरविली होती. या निर्णयाला खोटरे व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ५ मे रोजी निवडणूक होऊ शकली नाही. यानंतर आनंद कारेमोरे यांच्यासह संघाच्या १४ आजीवन सदस्यांनी अंतरिम आदेश मागे घेण्यासाठी मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन हे प्रकरण निकाली काढले आहे. मध्यस्थी अर्जदारांतर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी बाजू मांडली.