‘ताटातुटी’ नगरसेवकांच्या पथ्यावर
By Admin | Updated: September 26, 2014 02:26 IST2014-09-26T02:26:09+5:302014-09-26T02:26:09+5:30
शिवसेना-भाजपा युतीने घेतलेली फारकत आणि आघाडीतील बिघाडी मात्र इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडली आहे़

‘ताटातुटी’ नगरसेवकांच्या पथ्यावर
शेफाली परब-पंडित, मुंबई
शिवसेना-भाजपा युतीने घेतलेली फारकत आणि आघाडीतील बिघाडी मात्र इच्छुक उमेदवारांच्या पथ्यावर पडली आहे़ स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेले राजकीय पक्ष तगड्या उमेदवारांच्या शोधात आहेत़ तर अन्य राजकीय पक्षांचे पर्याय खुले झाल्यामुळे इच्छुकांना संधी चालून आल्या आहेत़ आतापर्यंत मनसे आणि काँग्रेसच्या पहिल्याच यादीतून पाच विद्यमान व दोन माजी नगरसेवकांना आमदारकीची तिकीटे मिळाली आहे़ त्यामुळे आणखी काही इच्छुक नगरसेवकांनाही यंदा लॉटरी लागण्याची शक्यता आहे़
विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुक नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत़ मात्र ज्याचे पक्षात वजन जास्त त्यालाच ही लॉटरी लागत असल्याचे आतापर्यंतचे चित्र होते़ त्यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न प्रत्येक निवडणुकीत भंग होत होते़ परंतु या वेळेस शिवसेना-भाजपात फारकत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बिघाडी असल्यामुळे संधी जास्त आणि तगडे उमेदवार कमी असे चित्र निर्माण झाले आहे़ त्यामुळे मित्रपक्षातील नाराजांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत़
मागच्या पालिका निवडणुकीत तिकीट कापले गेल्यामुळे अन्य पक्षामध्ये उडी घेतलेल्या नगरसेवकांनाही लॉटरी लागली आहे़ पितृपक्षामुळे यादी जाहीर करणे लांबणीवर टाकणाऱ्या मोठ्या राजकीय पक्षांनी आज घटस्थापनेच्या दिवशीच पहिली यादी जाहीर केली़ मनसे आणि काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान नगरसेवकांसह अन्य पक्षातून आलेल्या इच्छुकांनाही तिकीट देऊन खूश करण्यात आले आहे़ यामुळे अन्य पक्षातील इच्छुकांच्या अपेक्षा आणि पर्यायही वाढले आहेत़ (प्रतिनिधी)