पर्रीकर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात
By Admin | Updated: November 5, 2014 17:14 IST2014-11-05T01:08:23+5:302014-11-05T17:14:21+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. रा.स्व.संघाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या शक्यतेला बळकटी मिळू लागली आहे.

पर्रीकर लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. रा.स्व.संघाने हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या शक्यतेला बळकटी मिळू लागली आहे.
पर्रीकर यांनी ३० आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यावेळी त्यांच्या सहभागाचे संकेत मिळाले. अरुण जेटली सध्या अर्थमंत्रालयाच्या जबाबदारीत व्यग्र आहेत. त्यांच्याकडील संरक्षण खाते पर्रीकर यांना दिले जाईल. पर्रीकर हे दिल्लीहूनच गोव्याच्या कारभाराकडे लक्ष ठेवणार असून नव्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन करतील. पर्रीकर यांनी सदर प्रस्तावावर विचार करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. मोदी १२ नोव्हेंबर रोजी विदेश भेटीवर जात आहेत, तत्पूर्वीच हा अंक पार पडेल.
रा. स्व. संघाचा पाठिंबा
दिल्लीहून परतल्यानंतर पर्रीकर यांनी रा.स्व. संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात संपर्क साधून सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. दिल्लीला पर्रीकर सारखी प्रामाणिक आणि एकात्म व्यक्ती पाठविली जाण्यास संघाने अनुकूलता दर्शविली असून अद्याप निर्णय व्हायचा असल्याचे सूत्रांनी म्हटले. अनेक मंत्र्यांवर असलेला कामाचा ताण, दुसरी बाब म्हणजे झारखंड, बिहार आणि महाराष्ट्राला आणखी प्रतिनिधित्व देण्याची गरज पाहता मंत्रिमंडळात किमान १० ते १२ नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाईल.
माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचे पुत्र खा. जयंत सिन्हा यांचे स्थान पक्के मानले जाते. राजीवप्रताप रुडी, मुख्तार अब्बास नकवी यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडेल.