संरक्षणात थेट विदेशी गुंतवणुकीला पर्रीकरही अनुकूल
By Admin | Updated: November 10, 2014 03:24 IST2014-11-10T03:24:22+5:302014-11-10T03:24:22+5:30
संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण खात्यात थेट विदेशी गुंतवणुकीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

संरक्षणात थेट विदेशी गुंतवणुकीला पर्रीकरही अनुकूल
राजू नायक, नवी दिल्ली
संरक्षणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण खात्यात थेट विदेशी गुंतवणुकीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
भारत हा संरक्षण विषयक यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. आता आपण देशांतर्गतच त्याचे उत्पादन होईल हे पाहाणे अत्यावश्यक बनले आहे असे पर्रीकर म्हणाले. आपण यंत्रसामग्रीच्या आयातीवर खर्च करत असलेला पैसा हा एक मुद्दा आहे, पण ही यंत्रसामग्री देशांतर्गत उत्पादित केल्यास त्यातून नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे येईल आणि रोजगार निर्मितीही होईल. भारत त्यासाठी सक्षम आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोव्यातील मुख्यमंत्री निवडीबद्दल बोलताना ते म्हणाले की राजेंद्र आर्लेकर यांना संघाची पसंती असली तरी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. पार्सेकर यांनी विविध खाती हाताळली असून सरकारी कामकाजाची त्यांना माहिती आहे, त्यामुळेच त्यांची निवड झाली. नवीन सरकार कोणत्याही गोंधळाविना व्यवस्थित चालेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या खाण विषयक निर्णयांबद्दल आणि पर्यावरणसंबंधी बिगर सरकारी संघटनांना त्यात सोबत घेण्याच्या प्रश्नावर विचारले असता मला क्लॉड आल्वारिसांसह कोणाविषयीच वैयक्तिक आकस नाही असे सांगितले. सरकार, बिगर सरकारी संघटनेचे सदस्य यांनी मिळून पर्यावरणविषयक प्रश्नांवर निर्णय घेतील अशा प्रकारची व्यवस्था असण्यात काहीच गैर नसल्याचे त्यांनी सांगितले.
पार्सेकर सरकारला आर्थिक चणचण भासणार नसल्याचे सांगून येत्या दोन महिन्यांत लिलावाद्वारे सरकारी खजिन्यात ३५0 कोटी रुपये येतील असे सांगितले. ६00 कोटी रुपयांच्या खनिजाच्या लिलावातून सरकारला ३00 कोटी रुपये मिळतील. शिवाय इतर करांतून काही रक्कम मिळेल.