पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणा भोवण्याची शक्यता
By Admin | Updated: October 21, 2014 04:38 IST2014-10-21T04:37:17+5:302014-10-21T04:38:20+5:30
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणाची किंमत चुकवावी लागू शकते

पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणा भोवण्याची शक्यता
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पंकजा मुंडेंना बोलघेवडेपणाची किंमत चुकवावी लागू शकते. परळी विधानसभा मतदारसंघातील त्यांचे मताधिक्य २००९ च्या तुलनेत २०१४ च्या निवडणुकीत घटल्याचे ऐकून भाजप संसदीय मंडळाच्या सदस्यांना धक्काच बसला.
शिवसेनेने उमेदवार दिला नसतानाही त्यांचे मताधिक्य कमी झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ९६ हजार मते मिळवत ३६ हजार मताधिक्क्याने विजय नोंदविला होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्याला ६० हजार मते मिळाली होती. गोपीनाथ मुंडे यांचे जूनमध्ये अपघाती निधन झाल्यानंतर सहानुभूतीच्या लाटेवर मते मागूनही यावेळी पंकजा यांचे मताधिक्य कमी होऊन २५ हजारांवर आले. विशेष म्हणजे यावेळीही त्यांना ९६ हजार मतेच मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढूनही पंकजा यांना मतविभाजनाचा लाभ उचलता आला नाही. दुसरीकडे त्यांच्या धाकट्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विक्रमी सात लाख मतांनी विजयी होत इतिहास रचला.