३०० वटवाघळे मरण पावल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:15 PM2020-05-27T23:15:33+5:302020-05-27T23:15:38+5:30

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे.

Panic over the death of 300 tigers | ३०० वटवाघळे मरण पावल्याने घबराट

३०० वटवाघळे मरण पावल्याने घबराट

Next

गोरखपूर : चीनमध्ये वटवाघळातील कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग होऊन त्यातून या आजाराची भीषण साथ पसरली, अशी एक शक्यता वर्तविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या बेलघाट भागातील एका आमराईत सोमवारी ३०० वटवाघळे मरून पडल्याने त्या परिसरातील लोक घाबरून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच अधिकारीवर्गाने घटनास्थळी धाव घेतली. वटवाघळांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवून देण्यात आले. त्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे या तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल. कोरोना साथीचा व या वटवाघळांचा मृत्यूचा संबंध असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरल्याने बेलाघाट परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते.

हवेत उकाडा खूप वाढल्याने, तसेच या परिसरात पाण्याचीही टंचाई असल्यामुळे वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाला असावा अशीही अफवा समाजमाध्यमांत पसरली. त्यामुळे वटवाघळांना पाणी प्यायला मिळावे म्हणून स्थानिक लोकांनी दयाबुद्धीने घराबाहेर भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवले.

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे. त्यांनी सांगितले की, आमराईच्या जवळ असलेल्या झाडांवर ही वटवाघळे राहात होती. तेथून जवळच एक वीटभट्टीही आहे. तिच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणानेही ही वटवाघळे मरण पावली असण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

मृत्यूच्या कारणाबद्दल नाना तर्क

च्गोरखपूर जिल्ह्याचे वनाधिकारी अविनाशकुमार यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने वटवाघळे मरण पावल्याची माहिती सोमवारी सकाळी आठ वाजता मिळाल्यानंतर, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे ५८ वटवाघळांचे मृतदेह ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी बरेली येथील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठविले. ही वटवाघळे प्रचंड उकाड्याने किंवा कीटकनाशकाचे प्राशन केल्याने मरण पावली असावित, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक पी. एच. पाठक यांनी सांगितले की, बेलघाटमधील वटवाघळांचा व्हाईट नोज नावाच्या आजाराने मृत्यू झाला असावा, असे वाटते. विदेशात या आजाराने असंख्य वटवाघळे मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Panic over the death of 300 tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.