नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पनगढिया
By Admin | Updated: January 6, 2015 01:20 IST2015-01-06T01:20:15+5:302015-01-06T01:20:15+5:30
नीति आयोगाच्या उपाध्यक्षपदी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया यांची नेमणूक करण्यात आली आहे़

नीति आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पनगढिया
नियुक्त्या जाहीर : गडकरी, स्मृती इराणी विशेष निमंत्रित
नवी दिल्ली : नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय) अर्थात नीति आयोगाच्या उपाध्यक्षपदी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया यांची नेमणूक करण्यात आली आहे़ त्यांच्यासोबतच या आयोगाचे सहा सदस्य आणि तीन विशेष निमंत्रितांचीही नियुक्ती करण्यात आली आहे़ अर्थतज्ज्ञ विवेक देवरॉय आणि डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही़ के़सारस्वत यांची आयोगाचे पूर्णवेळ सदस्य, तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधामोहन सिंह हे पदसिद्ध सदस्य असतील. विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत यांचा समावेश करण्यात आला आहे़
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाने एक सहापानी निवेदन प्रसिद्ध करून नीति आयोग स्थापन केला. ही नवी संस्था केंद्र आणि राज्य सरकारांसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणार आहे़ त्यात या आयोगात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोण आहेत पनगढिया ?
च्६२ वर्षांचे अरविंद पनगढिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रोफेसर आहेत़ आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कॉलेज पार्क मेरीलँडच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र केंद्रात अर्थशास्त्राचे प्रोफेसर तसेच सहसंचालकपद त्यांनी भूषविले आहे़
च्प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पनगढिया यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना आणि व्यापार व विकासावरील संयुक्त राष्ट्र संमेलनात विविध पदांवर केले आहे.