पाकला धक्का, चीन व रशियाची भारताला साथ
By Admin | Updated: February 3, 2015 13:14 IST2015-02-03T13:10:40+5:302015-02-03T13:14:10+5:30
अमेरिका - भारतामधील जवळीक वाढत असून याचे परिणाम आता रशिया आणि चीनवर दिसू लागले आहे.
पाकला धक्का, चीन व रशियाची भारताला साथ
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - अमेरिका - भारतामधील जवळीक वाढत असून याचे परिणाम आता रशिया आणि चीनवर दिसू लागले आहे. संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात भारताने मांडलेल्या प्रस्तावाला चीन व रशियाने पाठिंबा देण्याचे संकेत देत पाकिस्तानला धक्का दिला आहे. पाकचा जवळचा मित्र असलेल्या चीनने इस्लामाबादमधील सत्ताधा-यांच्या विरोधात जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.
१९ वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्रात दहशतवादविरोधात महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादाला आधार आणि आर्थिक पाठबळ करणा-या देशांना दंड आकारणे असा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास त्याचा पहिला फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडवणा-यांना व या हल्ल्यांचे कट रचणा-यांना पाठबळ देणा-या पाकची संयुक्त राष्ट्रात कोंडी करण्यासाठी हा प्रस्ताव भारतासाठी महत्त्वाचा समजला जातो. सोमवारी चीनमध्ये भारत, रशिया आणि चीन यांची संयुक्त परिषद पार पडली असून यामध्ये तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. यामध्ये रशिया व चीनने भारताच्या दहशतवादविरोधी प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघात पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. यातून चीनचा भारताकडे बघण्याचा बदलेला दृष्टीकोन बदलल्याचे दिसते असे जाणकारांचे म्हणणे आहे. चीनमधील शिनजिआंग या प्रांतातील दहशतवादाला परदेशी पाठबळ असल्याचा चीनचा आरोप असून शिनजिआंगमधील दहशतावादामुळे चीनने भारताला साथ देण्याची तयारी दर्शवली असावी असेही सांगितले जाते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या या दौ-यात चीन व रशियाने भारताला आणखी महत्त्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे मान्य केले. संयुक्त राष्ट्र, आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य (अपेक), शांघाई सहकार्य संघटनेमध्ये (एससीओ) भारताने महत्त्वाची भूमिका निभवायला हवी यावर चीन व रशियाचे एकमत झाले.