पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्करातील हमालाचा मृत्यू
By Admin | Updated: May 28, 2017 17:08 IST2017-05-28T17:08:50+5:302017-05-28T17:08:50+5:30
पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एका लष्करातील हमालाचा मृत्यू झाला

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्करातील हमालाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानकडून केरन सेक्टरमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एका लष्करातील हमालाचा मृत्यू झाला असून, आणखी एक नागरिक जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केरन सेक्टरमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यात एका लष्कराच्या हमालाचा मृत्यू झाला. त्या हमालाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.
गेल्या काही तासांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करणा-यालाही भारतीय सैन्यानं ठार केलं आहे. रविवारी पहाटे 2.30 वाजता ही कारवाई करण्यात आली होती. घुसखोर करणारी एक व्यक्ती ठार झाल्याचे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले होतं. त्रालमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला करणारे दोन दहशतवादीही चकमकीमध्ये ठार झाले होते. साईमुह गावात लष्कराच्या गस्तीपथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. हा हल्ला होताच, जवानांनी लगेचच येथील परिसराला घेराव घालून त्यांचा शोध सुरू केला होता. त्या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात आले होते.
तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये १0 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा कमांडर आणि गेल्या वर्षी चकमकीत ठार झालेल्या बुरहान वनीचा वारसदार सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला आहे. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.
सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला आहे. किमान ५0 ठिकाणी दगडफेक सुरू झाली. हिंसाचारामुळे बऱ्याच भागांमध्ये बंदसदृष्य वातावरण असून, कुलगाम, पुलवामा आणि शोपियन या भागांत सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत