पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. तसेच भारताकडूनपाकिस्तानविरोधात कठोर कारवाईच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. तर भारताविरोधात वातावरण तापण्यासाठी पाकिस्तानकडून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खोटारडेपणाचा सहारा घेतला जात आहेत. त्यामाध्यमातून भारत सरकार आणि येथील प्रशासनाबाबत नकारात्मक वातावरणनिर्मिती करण्याता प्रयत्न पाकिस्तान करत आहे.
भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिल्यानंतर पाकिस्तानने अशीच एक खोटी बातमी पेरून भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांशी लढताता हुतात्म झालेला जम्मू काश्मीर पोलीस दलातील जवान मुदस्सिर अहमद शेख ऊर्फ बिंदास याची आई शमीम अख्तर ही पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी असल्याने तिला पाकिस्तानात पाठवण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र ही बाब खोटी असल्याचे आता उघड झाले आहे.
जम्मू काश्मीर पोलीस दलातील जवान मुदस्सिर अहमद शेख ऊर्फ बिंदास यांना २२ मार्च २०२२ रोजी बारामुल्लामधील कुंजर परिसरात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले होते. या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. त्यावेळी दाखवलेल्या पराक्रमासाठी बिंदास यांना भारत सरकारने मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित केले होते.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुदस्सर यांच्या आईला शौर्यचक्र प्रदान केले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या घराला भेट दिली होती.
दरम्यान, या प्रकरणात पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा उघडकीस आल्यानंतर हुतात्मा बिंदास यांच्या आई वडिलांशी तातडीने संपर्क साधण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडीओमधून पाकिस्तानचा खोटा प्रोपेगेंडा समोर आला. बिंदास यांच्या वडिलांनी सांगितले की, ते स्वत: जम्मू काश्मीर पोलिसांमधून निवृत्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी आमच्या घरी आम्हाला ओळखणारा एक डीएसपी आला होता. तो त्या परिसरातील कुठल्या तरी पाकिस्तानी कुटुंबाला नेण्यासाठी आला होता. तो आम्हाला ओखळत असल्याने चहापानासाठी आमच्या घरी आला होता.
तो डीएसपी गेल्यानंतर हुतात्मा बिंदास याच्या आईची प्रकृती काही कारणाने बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्यात आले. यादरम्यान, तिला जबरदस्तीने पाकिस्तानात पाठवण्यात येत असल्याची अफवा पसरली. या प्रकरणात काहीही सत्य नाही आहे. ही एक अफवा आहे. बिंदास याची आई आपल्या घरी आराम करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.