पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद
By Admin | Updated: July 15, 2017 18:46 IST2017-07-15T18:45:21+5:302017-07-15T18:46:42+5:30
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 15 - जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेले लान्स नायक मोहम्मद नासीर यांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली.
शनिवारी पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट आणि बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीश मेहता यांनी दिली. पाकिस्तानने दुपारी 1.40च्या सुमारास गोळीबार सुरु केला. छोटया स्वयंचलित शस्त्रांनी पाकिस्तानने भारतीय सैन्य चौक्यांना लक्ष्य केले.
आणखी वाचा
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले. त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी त्रालमधील सातोरा येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सध्या चकमक संपली असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
यातील एक दहशतवादी पाकिस्तानमधील असल्याचे म्हटलं जात आहे. गेल्या महिन्यांमध्ये सीमारेषेवर घुसखोरी व शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्जिकल स्ट्राईकनंतर या घटना वाढल्याचं दिसत आहे.
दरम्यान, 10 जुलैच्या रात्री दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात गुरुवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत. गुरुवारी पाकिस्ताने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये असलेल्या नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराचे जवान सुद्धा जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले.