Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज(दि.23) सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पदग्रहण समारंभात भाग घेतला. यावेळी त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक केले. तसेच, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा उल्लेख करत तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारवर टीकाही केली.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा होतेय. यापूर्वी भारताने नेहमीच बचावात्मक प्रतिक्रिया दिली. पण, पहिल्यांदा भारताने पाकिस्तानात घुसून उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर बालाकोटमध्ये प्रवेश करुन उरीपेक्षाही कठोर उत्तर दिले. आताही ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी पाकिस्तानला कधीही अशाप्रकारचे उत्तर देण्यात आले नव्हते, अशी प्रतिक्रिया शाहांनी दिली.
ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याचे वर्णन करताना अमित शाह म्हणाले की, भारतीय सैन्याने 7 मेच्या रात्री पाकिस्तानमध्ये घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लष्कराला किंवा हवाई तळाला हात लावला नाही. आम्ही फक्त दहशतवादी तळांवर हल्ला केला. जगभरातील दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे, हे पाकिस्तानने सिद्ध केले आहे. सैन्याने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, त्याबद्दल संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे. देशाचा असा विश्वास आहे की जोपर्यंत बीएसएफ आहे तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य एक इंचही पुढे जाऊ शकत नाही, असेही शाह म्हणाले.