नवी दिल्ली - भारत सरकार पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संरक्षण करारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या करारामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर काय परिणाम होऊ शकतात याचा आढावा भारत घेत आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करणे आणि सर्वच क्षेत्रात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या संरक्षण करारावर भारताने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियात झालेल्या करारानुसार, जर कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे. त्याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटलंय की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात दीर्घ काळापासून सुरू असलेल्या चर्चेला औपचारिक स्वरूप देणार असल्याची भारताला माहिती होती. सरकार या घटनाक्रमाकडे राष्ट्रीय सुरक्षा, प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेवर पडणारा प्रभाव यादृष्टीने आढावा घेत आहे. भारत स्वत:च्या हिताचे रक्षण आणि सर्व क्षेत्रात व्यापक राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी सांगितले.
एकावर हल्ला २ दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात हा संरक्षण करार पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाद दौऱ्यात झाला. शहबाज शरीफ यांनी क्राऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. जियो न्यूजनुसार, या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार करण्यात आला. या करारानुसार, दोन्ही पैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला समजला जाणार आहे. करारानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात जवळपास ८ दशकांची भागीदारी, बंधुता, इस्लामिक एकता याआधारावर एकमेकांच्या सहमतीने संरक्षण करारावर सही केल्याचं म्हटलं आहे.
भारताची चिंता वाढवणारा करार
दरम्यान, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा संरक्षण करार अशावेळी झाला आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावात आहे. त्यात या करारामुळे भारताची चिंता वाढू शकते. भारत सरकार या दोन्ही देशांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून देशाच्या सुरक्षेसाठी योग्य ती पाऊले उचलत असल्याचं सांगितले जाते. भारतासाठी हा करार अनेक दृष्ट्या चिंतेचा विषय आहे. सर्वात आधी हा करार पाकिस्तानला आणखी मजबूत बनवणार आहे. त्याशिवाय पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा यातून प्रयत्न करणार आहे. त्यातून प्रादेशिक अस्थिरता आणखी वाढू शकते.