दणका मिळूनही नाही सुधरला पाकिस्तान! रेंजर्सच्या गोळीबारात भारतीय लष्कराचे कॅप्टन जखमी
By पवन देशपांडे | Updated: January 17, 2018 09:48 IST2018-01-17T09:44:18+5:302018-01-17T09:48:05+5:30
सैन्य दिनी भारतीय लष्कराकडून जबरदस्त दणका मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तनात अजिबात सुधारणा झालेली नाही. पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना टार्गेट करत गोळीबार केला.

दणका मिळूनही नाही सुधरला पाकिस्तान! रेंजर्सच्या गोळीबारात भारतीय लष्कराचे कॅप्टन जखमी
श्रीनगर - सैन्य दिनी भारतीय लष्कराकडून जबरदस्त दणका मिळाल्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तनात अजिबात सुधारणा झालेली नाही. मंगळवारी पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्कराच्या चौक्यांना टार्गेट करत गोळीबार केला. यामध्ये भारतीय लष्कराचे कॅप्टन जखमी झाले.
मंगळवारी संध्याकाळी पूँछमधील चाकन दा बाग भागात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला अशी माहिती अधिका-याने दिली. पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या कॅप्टनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूकडून गोळीबार सुरु होता अशी माहिती सुरक्षा अधिका-याने दिली.
दोन दिवसापूर्वीच भारतीय लष्कराने पूँछमध्ये धडक कारवाई करत पाकिस्तानी सैन्याच्या मेजरसह सात सैनिकांना यमसदनी धाडले होते. भारताने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे चार सैनिकही जखमी झाले होते. नियंत्रण रेषेवर तणाव असल्याने भारतीय यंत्रणेने चाकन दा बाग आणि रावलकोट भागात चालणारी बस सेवा तात्पुरती बंद केली आहे.
सीमेवर भारताची घातक कारवाई
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. सोमवारी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानमधील पूंछ सेक्टर येथील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर भारतीय सैन्याने गोळीबार केला. यात पाकचे सात जवान ठार झाले. घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या ‘जैश- ए- मोहम्मद’च्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची घटना ताजी असतानाच भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्यालाही दणका दिला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात शनिवारी भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला होता. याविरोधात भारताने कारवाई करत पाकिस्तानच्या सात सैनिकांचा खात्मा केला आहे तर चार सैनिक जखमी झाले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळी भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे, एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी वैद्य यांनी दिली आहे.