पाकने भारतावर रोखली आहेत १३० अण्वस्त्रे - अमेरिकी अहवाल
By Admin | Updated: January 21, 2016 17:40 IST2016-01-21T17:40:11+5:302016-01-21T17:40:11+5:30
भारताने लष्करी कारवाई करू नये यासाठी पाकिस्तानने ११० ते १३० अणूबाँब भारताच्या दिशेने रोखले असल्याचे अमेरिकी संसदेच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पाकने भारतावर रोखली आहेत १३० अण्वस्त्रे - अमेरिकी अहवाल
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २१ - भारताने लष्करी कारवाई करू नये यासाठी पाकिस्तानने ११० ते १३० अणूबाँब भारताच्या दिशेने रोखले असल्याचे अमेरिकी संसदेच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताला लष्करी कारवाई करण्यापासून याप्रकारे परावृत्त करण्याची इस्लामाबादची भूमिका भारत व पाकिस्तानमध्ये आण्विक संघर्ष निर्माण करेल अशी भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानकडे किमान ११० अण्वस्त्रे असल्याचे या अहवालात ठामपणे म्हटले आहे. पाकिस्तान अण्वस्त्रांमध्ये वाढ करत आहे, त्याचप्रमाणे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांमध्येही भर टाकत असल्याचे दिसून आले आहे.
या २८ पानी काँग्रेशनल रीसर्च सर्व्हिस रिपोर्टमध्ये भारताला मुख्यत: लष्करी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी पाकिस्तान अण्वस्त्रे रोखून असल्याचे म्हटले असले तरी दोन्ही देशांमध्ये आण्विक संघर्ष होऊ शकतो असेही म्हटले आहे.
पाकिस्तानी सरकारचा कट्टरतावादी कब्जा घेऊ शकतात, तसेच त्यांच्या ताब्यात अणुतंत्रज्ञान लागू शकतं, असा धोकाही या अहवालात नमूद केलेला आहे.