सीमेवर पाकचा रात्रभर गोळीबार
By Admin | Updated: January 2, 2015 02:18 IST2015-01-02T02:18:20+5:302015-01-02T02:18:20+5:30
५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सीमेवर पाकचा रात्रभर गोळीबार
जम्मू : पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत सांबा सेक्टरमधील भारताच्या १३ सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला़ सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत भारत पाकिस्तानकडे तीव्र आक्षेप नोंदवणार आहे़ ५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बुधवारी पाकिस्तानच्या मुजोरीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ठोस प्रत्युत्तर देत चार पाकिस्तानी रेंजरला ठार मारले होते़ भारतीय जवानांनी गोळीबार थांबवावा, यासाठी पाकिस्तानी सैन्याला पांढरे निशाण फडकवावे लागले होते़ भारताचाही जवान या गोळीबारात शहीद झाला होता़
गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा आणि आठवडाभरात सातव्यांदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे़
सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर नियमभंग केला आहे़ आम्ही शस्त्रसंधी भंगाबाबत पाकिस्तानकडे कठोर विरोध नोंदवू़ पाकिस्तानी रेंजरनी रात्रभर सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला़
भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले़ सकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता़ या गोळीबारात प्राणहानी झाली नाही़ सुमारे ५० ते ६० अतिरेकी पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले़
दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवायला हवे़ दोन्ही देशाचे अधिकारी या मुद्यासंदर्भात संपर्कात आहेत. सीमेवरील स्थिती लवकरच सामान्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह गुरुवारी म्हणाले़ (वृत्तसंस्था)
शहीद साथी... आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान राम गवारिया हे हुतात्मा झाले. त्यांच्या मृतदेहावर जम्मूतील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने पुष्पचक्र अर्पण केले.
च्जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पाकिस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार राहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंटियरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शर्मा यांनी येथे दिला आहे.
च्जर पाकिस्तानी रेंजर्सनी आमच्यावर गोळीबार केला तर अम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ. पाकने बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत बीएसएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला होता. त्यात कॉन्स्टेबल राम गवारिया हे शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत शर्मा बोलत होते.