जम्मूमध्ये पाकिस्तानचा पुन्हा BSF चौक्यांवर गोळीबार
By Admin | Updated: October 22, 2016 07:54 IST2016-10-22T07:54:33+5:302016-10-22T07:54:33+5:30
भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाही.

जम्मूमध्ये पाकिस्तानचा पुन्हा BSF चौक्यांवर गोळीबार
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २२ - पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्यानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झालेली नाही. भारतीय सीमा सुरक्षा दल पाकिस्तानकडून होणा-या या गोळीबाराच्या आगळीकीला प्रत्येकवेळी चोख प्रत्युत्तर देत आहे.
शुक्रवारी रात्री जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने जोरदार गोळीबार केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला तितकेच सडेतोड प्रत्युत्तर दिले. सीमेजवळील गावात रहाणा-या नागरीकांना घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इथे रहाणा-या नागरीकांना अद्यापपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले नसून, पुढचे १८ तास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल अशी माहिती जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली.
काल नियंत्रण रेषेजवळ गोळीबार करणा-या पाकिस्तानी रेंजर्सना भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला. बीएसएफने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले.