हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली पाकिस्तान एअरलाइन्सच्या कार्यालयाची तोडफोड
By Admin | Updated: January 14, 2016 18:46 IST2016-01-14T18:15:08+5:302016-01-14T18:46:04+5:30
हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान एअरलाइन्सच्या दिल्लीतल्या कार्यालयाची गुरुवारी तोडफोड केली आहे

हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली पाकिस्तान एअरलाइन्सच्या कार्यालयाची तोडफोड
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान एअरलाइन्सच्या दिल्लीतल्या कार्यालयाची गुरुवारी तोडफोड केली आहे. दिल्लीतल्या ल्युटन्समधील बाराखंबा रोडवर पाकिस्तान एअरलाइन्सचे कार्यालय आहे. याप्रकरणी हिंदू सेनेच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.
हिंदू सेनेचा नेता विष्णू गुप्ताच्या बरोबर काही कार्यकर्ते बाराखंबा रोड मेट्रो स्टेशनच्या समोर असलेल्या पाकिस्तान एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी तोडफोड केल्याचे पोलीसांनी सांगितले.
काचेच्या भिंतींची नासधूस करण्यात आली असून लगेचच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या मवाळ भूमिकेच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तान एअरलाइन्सच्या अधिका-यांनी तक्रार दाखल केल्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलीस अधिका-यांनी सांगितले. या हल्ल्यासंदर्भात गुप्ता यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.