श्रीनगरमध्ये पाकिस्तान व IS चा झेंडा, फुटीरतावाद्यांची आगळिक
By Admin | Updated: July 18, 2015 15:23 IST2015-07-18T15:23:51+5:302015-07-18T15:23:51+5:30
शनिवारी संपूर्ण देश ईद साजरी करत असताना श्रीनगरमध्ये पाकिस्तान व इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावण्यात आल्याचे वृत्त आहे

श्रीनगरमध्ये पाकिस्तान व IS चा झेंडा, फुटीरतावाद्यांची आगळिक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - शनिवारी संपूर्ण देश ईद साजरी करत असताना श्रीनगरमध्ये पाकिस्तान व इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावण्यात आल्याचे वृत्त आहे. हुरीयतचा फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानीना नजरकैदेतून मुक्त करावं या मागणीसाठी त्यांचे पाठिराखे रस्त्यावर उतरले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीसांनी अश्रूधराचा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीनगरमध्ये उघडपणे रस्त्यांवर पाकिस्तान व इस्लामिक स्टेटचे झेंडे फाडकावल्याचे दिसत होते.
ईदनिमित्त प्रार्थना करण्यासाठी जमलेला जमाव प्रार्थनेनंतर आक्रमक झाल्याचेही वृत्त आहे. सुमारे १५० जणांच्या जमावाने तुफान दगडफेक करत अनंतनागमधल्या लाल चौकात पोलीसांवर हल्ला केला.विशेष म्हणजे कालच सक्तवसुली संचालनालयाने हुरीयतच्या दोन नेत्यांवर दहशतवादी कारवायाना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोपपत्र दाखल केले आहे.
पूंछमध्ये पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
दरम्यान, पाकिस्तानने सीमेजवळच्या पूंछ भागातील तीन ठिकाणी गोळीबार करत शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने वाघा बॉर्डवर भारताकडून ईदनिमित्त पाठवलेली मिठाई स्वीकारण्यास नकार दिला आहे. बांग्लादेशच्या जवानांनी भारताकडून शुभेच्छा स्वीकारल्या मात्र, पाकिस्तानने या शुभेच्छा न स्वीकारत परंपरेलाही जुमानलेले नाही.