पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणार

By Admin | Updated: June 2, 2015 00:35 IST2015-06-02T00:35:49+5:302015-06-02T00:35:49+5:30

कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याप्रकरणी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात

Pak to be held in international court | पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणार

पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणार

नवी दिल्ली : कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याप्रकरणी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची तयारी भारताने चालविली आहे.
अपवादात्मक परिस्थिती पाहता भारताने यापूर्वीच्या भूमिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश राष्ट्रकुलचे सदस्य असल्यामुळे सशस्त्र संघर्ष किंवा वैमनस्याचा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार नाही, असा करार असला तरी सौरभ कालिया यांच्या अपवादात्मक प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकार करणार आहे, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी सरकार देशभक्त असेल असे वाटले होते; मात्र या सरकारने घोर निराशा केली आहे, या शब्दांत शहीद सौरभ कालिया याचे वडील डॉ. एन. के. कालिया यांनी दु:ख व्यक्त केले होते. डॉ. कालिया यांनी कारगील युद्धातील शहिदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयीन लढा चालविला आहे.
अमानुष छळ
१५ मे १९९९ रोजी कारगीलच्या कास्कर भागात गस्तीवर असताना कॅप्टन कालिया आणि अन्य पाच भारतीय जवानांना पकडण्यात आल्यानंतर कारागृहात ठेवून त्यांचा अमानुष पद्धतीने छळ करून ठार मारण्यात आले होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)


 

Web Title: Pak to be held in international court