पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या घटनेबाबतच्या अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होत आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. तसेच सरकारनेही पहलगाममध्ये सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे मान्य केले. दरम्यान, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याचा फोटो घेणाऱ्या एका महिलेले सनसनाटी दावा केला आहे. तपास यंत्रणांनी ज्या दहशतवाद्याचे स्केच प्रसिद्ध केले होते. त्या दहशतवाद्यासोबत आमचं भांडण झालं होतं, असा दावा एकता तिवारी नावाच्या या महिलेले केला आहे.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथील रहिवासी असलेल्या एकता तिवारी हल्ला झाला त्यावेळी पहलगाम येथे जात होत्या. दरम्यान, त्या नुकत्याच जम्मू-काश्मीरहून परतल्या असून, ज्या दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. त्यापैकी दोघांसोबत आमच्या ग्रुपचं भांडण झालं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, आमचा २० जणांचा ग्रुप १३ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. आम्ही २० एप्रिल रोजी पहलगाम येथे पोहोचलो. त्याच दिवशी आम्हाला काही गोष्टी संशयास्पद वाटल्या. त्यामुळे आम्ही बेसरनपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर उतरलो. त्यावेळी आजूबाजूच्या काही लोकांचे इरादे आम्हाला बरोबर वाटत नव्हते. ते आम्हाला कुराण पठण करण्यासा सांगत होते.
एकता यांनी पुढे सांगितले की, आम्ही जेव्हा खेचरावर बसून चढाई करत होतो, त्यादरम्यान, दोघेजण आम्हाला भेटले. त्यांनी माझ्याबाबत विचारले. तसेच आमच्या ग्रृपमध्ये किती लोक आहेत, याबाबत विचारणा केली. त्यांनी आम्हाला कुठल्या धर्माचे आहात, हिंदू की मुस्लिम? असे विचारले. त्याशिवाय त्यांनी आम्हाला कुराण पढण्यासही सांगितले होते.तसेच गळ्यात रुद्राक्ष का परिधान केले आहेत, असेही विचारले. त्यावर माझ्या भावाने आम्हाला रुद्राक्ष धारण करायला आवडतात, असं सांगितलं. त्यानंतर आमची त्यांच्यासोबत थोडी वादावादी झाली. तसेच आम्ही त्यांच्या खेचरांवरून उतरून दुसऱ्या खेचरवाल्याच्या मदतीने माघारी आलो, असे त्यांनी सांगितले.
एकता तिवारी पुढे म्हणाल्या की, आमच्यासोबत वादावादी झाल्यानंतर त्यांच्यापैकी एका व्यक्तीला फोन आला. त्याने थोडं बाजूला जाऊन सांगितलं की, प्लॅन ए फेल झाला आहे. ते खोऱ्यामध्ये ३५ बंदुका पाठवण्याबाबत बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून मला आलेला संशय अधिकच दृढ झाला. तसेच ज्या तरुणाने ३५ बंदुकांबाबत बोलणं केलं होत, त्याचा फोटो माझ्याकडे आहे. तसेच दहशतवाद्यांचे स्केच समोर आल्यानंतर मी त्याला ओळखलं आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, एकता तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी यांनी सांगितले की, आम्ही येथून वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. कटरा येथे वैष्णौदेवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही संपूर्ण टूर पॅकेज घेतलं. आमच्या ग्रुपमध्ये एकूण २० लोकं होतं. माझ्या पत्नीसोबत चालत असलेल्या एका व्यक्तीने आम्हाला कुणार पठण करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने मलाही याबाबत सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना तिथून मागे फिरण्यास सांगितले. मात्र त्यावरून त्यांनी आमच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आम्हाला त्यांच्यावर संशय येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते वारंवार कुराण पढण्यास सांगत होते. तसेच आमचा पत्ता विचारत होते. अखेरीस त्यांना बंदुकांचा विषय काढल्यावर आमचा संश अधिकच दृढ झाला, असेही ते म्हणाले.