गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तीव्र भावना निर्माण झाली होती. तसेच दोन्ही देशांमध्ये कमालीचं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर या हल्ल्यामागचे धागेदोरे समोर आणण्यासाठी एनआयएकडून कसून तपास केला जात आहे. दरम्यान, एनआयएकडून सुरू असलेल्या तपासामधून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी हे जम्मूमधील कथुआ येथून भारतामध्ये आले. तसेच पर्यटकांमध्ये मिसळले. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना एका फूड कोर्टमध्ये एकत्र केले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
तपासामधून समोर आलेल्या अधिक माहितीनुसार पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांमधील दोघे दक्षिण काश्मीरमधील होते. ते अटारी बॉर्डरवरून पाकिस्तारमध्ये गेले होते. मात्र ते भारतात कसे परतले, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. ते जम्मूमधील कथुआ येथून भारतात परतले असावेत, अशा अंदाज आहे. पहलगाममधील बैसरन व्हॉली येथे पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी या दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये मिसळून त्यांना फूड कोर्टमध्ये गोळा केले. त्यानंतर इतर दोन दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या. पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळ्या झाडणारे दहशतवादी हे पाकिस्तानी होते.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे ४ ते ५ दिवसांपासून बेसरनच्या आसपासच होते. स्थानिकांनी मदत केल्याशिवाय हे शक्यच नव्हतं. मिळत असलेल्या गोपनीय माहितीमध्ये वायरलेस चॅटिंग हे त्याच भागातून सुरू होते, असे समोर आले आहे. मात्र त्यांच्याकडील संपर्काची उपकरणं ही वेगळी असल्याने त्यांच्यात काय बोलणं होत होतं हे समजू शकलेलं नाही. दरम्यान, हत्यारबंद दहशतवादी मुक्तपणे फिरत असल्याने सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. सुरक्षा दलांना घटनास्थळावरून स्नायपर रायफल, एम-सीरिज रायफल आणि बुलेटप्रुफ जॅकेट भेदणाऱ्या गोळ्या सापडल्या आहेत. ही अफगाणिस्तानमध्ये नाटोच्या सैनिकांची उरलेली शस्त्रास्त्रे असावित असा अंदाज आहे.