Pahalgam Terror Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिकानेरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला. दरम्यान, आता काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींच्या याच बिकानेर दौऱ्यातील भाषणावरुन त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींना चार प्रश्न विचारले आहेत.
गुरुवारी (22 मे) ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आज बिकानेरमध्ये चित्रपटांमधील संवादांचा वापर केला, त्यापेक्षा देश त्यांना विचारत असलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तरे देणे अधिक महत्त्वाचे आहे.
1-पहलगामचे निर्दयी मारेकरी अजूनही मोकाट का फिरत आहेत? काही अहवालांनुसार, गेल्या 18 महिन्यांत पूंछ, गगनगीर आणि गुलमर्ग येथे झालेल्या तीन इतर दहशतवादी हल्ल्यांसाठीही हाच दहशतवादी गट जबाबदार होता.
2-तुम्ही आतापर्यंत कोणत्याही सर्वपक्षीय बैठकीचे अध्यक्षपद का घेतले नाही? विरोधी पक्षांना विश्वासात का घेतले नाही?
3-ऑपरेशन सिंदूरदरम्यान निर्माण झालेल्या चीन-पाकिस्तान युतीच्या पार्श्वभूमीवर 22 फेब्रुवारी 1994 रोजी संसदेत एकमताने मंजूर झालेल्या ठरावाचा पुनरुच्चार करण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितीनुसार तो पुन्हा तयार करण्यासाठी तुम्ही संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले नाही?
4-अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी अमेरिकेच्या भूमिकेबद्दल वारंवार केलेल्या दाव्यांवर गेल्या दोन आठवड्यांपासून तुम्ही गप्प का राहिला आहात?
हे चार प्रश्न जयराम रमेश यांनी विचारले आहेत.
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बिकानेरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, 22 एप्रिल रोजी आपल्या माता बहिणींचा धर्म विचारुन त्यांचा सिंदूर हिसकावण्यात आला. त्या घटनेनंतर 140 कोटी देशवासीयांनी दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्याचा संकल्प केला होता. आमच्या सरकारने तिन्ही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले अन् सैन्यांनी मिळून पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. माझ्या नसांमध्ये रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत आहे. आता पाकिस्तानसोबत ना व्यापार होणार, ना चर्चा. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत त्याला चुकवावी लागेल.