पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदीची पत्नी आशान्या हिने तिच्या पतीला शहीद दर्जा देण्याची मागणी केली आहे. आशान्याने दिलेल्या माहितीनुसार, शुभमने स्वतः हिंदू असल्याचं अभिमानाने सांगून आपलं बलिदान दिलं आहे आणि अनेक लोकांचा जीव वाचवला. दहशतवाद्यांनी पहिली गोळी माझ्या पतीवर झाडली. कानपूरमधील ३१ वर्षीय व्यावसायिक शुभमने १२ फेब्रुवारी रोजी आशान्याशी लग्न केलं होतं.
गुरुवारी शुभमवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. आशान्या म्हणाली की, "शुभमला शहीदाचा दर्जा द्यावा. मला सरकारकडून दुसरं काहीही नको आहे. जर सरकारने माझी ही मागणी मान्य केली तर मला जगण्याचं एक कारण मिळेल. नाव आणि धर्म विचारून जो कोणी गोळीबार करतो त्याचा खात्मा केला पाहिजे. २२ एप्रिलला जेव्हा दहशतवादी शुभमकडे आले आणि त्यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारलं तेव्हा तिला वाटलं की ते मस्करी करत आहेत."
"माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
"आम्ही हिंदू आहोत हे उत्तर देताच गोळी झाडली"
"एकाने विचारले की, तुम्ही हिंदू आहोत की मुस्लिम? मला वाटलं ते (दहशतवादी) मस्करी करत आहेत. मी मागे वळून हसले आणि त्यांना विचारलं की काय चाललं आहे. मग त्याने त्याचा प्रश्न विचारला आणि मी आम्ही हिंदू आहोत हे उत्तर देताच गोळी झाडली गेली आणि माझ्यासाठी सर्व काही संपलं. शुभमचा चेहरा रक्ताने माखला होता. मला समजत नव्हतं की काय चाललंय?"
Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
"तुला जिवंत ठेवत आहेत जेणेकरून तू..."
"मी दहशतवाद्यांना मलाही गोळ्या घालण्यास सांगितलं, पण त्यांनी नकार दिला, ते म्हणाले की, तुला जिवंत ठेवत आहेत जेणेकरून तू जाऊन सरकारला सांग की आम्ही केलं." याच दरम्यान, शुभमचे वडील संजय द्विवेदी यांनी परिसरात सुरक्षा कर्मचारी नसल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील शुभम द्विवेदीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.