जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांची घरे पाडून टाकण्यात आली आहेत. पाकिस्तानविरोधात लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. या लोकांनाही पाकिस्तान सोडावे लागण्याची शक्यता आहे.
पहलगाममध्ये काही पर्यटकांना आधीच दहशतवादी हालचालींची माहिती मिळाली होती. परंतू, ते सुरक्षा यंत्रणेपर्यंत पोहोचविले गेले नव्हते. तसेच दोन हजाराच्या आसपास पर्यटक असलेल्या भागात एकही सैन्याचा जवान, पोलीस नव्हता. दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही सुमारे तासा-दीड तासाने पोलीस आणि सैन्य पोहोचले. एका मुलाचा ४५ मिनिटांनी तडफडून मृत्यू झाला. ही सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक होती. यावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. काही भारतीय विद्यार्थी पाकिस्तानात शिकत असल्याची आकडेवारी संसदेत जाहीर करण्यात आली होती. गेल्या वर्षी जानेवारी २०२४ पर्यंत जगभरात १३ लाख भारतीय विद्यार्थी शिकत असल्याचे म्हटले होते. यात पाकिस्तानात १४ भारतीय शिकत होते. पाकिस्तानमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तिथे गेले आहेत.
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध...पाकिस्तानात किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटी, पंजाब मेडिकल कॉलेज फैसलाबाद, रावळपिंडी मेडिकल कॉलेज पाकिस्तान, कायद-ए-आझम मेडिकल कॉलेज, पंजाब मेडिकल कॉलेज, अल्लामा इक्बाल मेडिकल कॉलेज, कराची विद्यापीठ आदी शिक्षण संस्था आहेत. परंतू, भारतात पाकिस्तानी डिग्रीला मान्यता नाही. २०२२ मध्येच युजीसी आणि एआयसीटीईने पाकिस्तानी पदवी मान्यताप्राप्त नसल्याचे जाहीर केले होते. तरीही १४ जण तिथे शिकत आहेत. या लोकांना भारताता कुठेही नोकरी नाही तसेच उच्च शिक्षणासाठी भारतात तरी प्रवेश मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते.