Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवून टाकले आहे. त्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थे(एनआयए) कडे असून, ने आता प्राथमिक तपासाचा अहवाल समोर आला आहे. एनआयएच्या तपासात पाकिस्तानचा एक मोठा डाव उघडकीस आला आहे.
एनआयएच्या सुरुवातीच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने करण्यात आला. आयएसआयच्या आदेशावरुन पाकिस्तानातील लष्कर मुख्यालयात या हल्ल्याचा प्लॅन ठरला. तपासात असेही दिसून आले की, हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये बसलेल्या त्यांच्या हँडलर्सच्या संपर्कात होते, त्यांना पाकिस्तानकडून निधी मिळत होता.
दहशतवाद्यांची ओळख पटलीपहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. मुख्य दहशतवाद्यांची नावे हाशिम मुसा आणि अली उर्फ तल्हा भाई अशी आहेत. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. दोघांनाही काश्मीरमध्ये राहणाऱ्या आदिल ठोकरने मदत केली.
हल्ल्यात OGW ची भूमिकापाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्यात ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) ची भूमिका समोर आली आहे. हे स्थानिक लोक असून, दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट, माहिती, मार्गदर्शन आणि लपण्याची ठिकाणे पुरवतात. पहलगाम चौकशीत 150 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. OGW च्या सहकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.
एनआयए महासंचालकांच्या (डीजी) नेतृत्वाखाली तयार केलेला हा अहवाल लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला जाईल. या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली जाईल.