Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दहशतवाद्यांविरोधात पूर्ण क्षमतेने कारवाई करत आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यापासून आरोपींचा शोध सुरू आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसदेखील या कारवाईत सैन्याला साथ देत आहेत. घटनेला 23 दिवस उलटूनही आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही, परंतु या शोध मोहिमेदरम्यान इतर दहशतवाद्यांवर कारवाई केली जात आहे.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून 100 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले. आता सैन्याने स्थानिक दहशतवाद्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या 50 तासांत भारतीय सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकीत 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी स्थानिक म्हणजेच काश्मिरी आहेत.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठारपुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील त्राल भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अहमद, आमिर नजीर आणि आसिफ अशी आहेत.
शोपियानमध्ये लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादीही ठारयापूर्वी शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा ऑपरेशन कमांडर शाहिद कुट्टेचाही समावेश आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कुट्टे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम करायचा. त्याने अनेक तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवले होते.
कुट्टे याच्यासोबत शोपियानच्या वंदुना मेल्हुरा भागातील रहिवासी अदनान शफी आणि शेजारच्या पुलवामा जिल्ह्यातील मुरान भागातील रहिवासी एहसान उल हक शेख हादेखील चकमकीत मारला गेला आहे. तिन्ही दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून सक्रिय होते आणि अनेक दहशतवादी हल्ले करण्यात सहभागी होते. दहशतवाद्यांकडून दोन एके मालिकेतील रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा, ग्रेनेड आणि इतर युद्ध साहित्य जप्त करण्यात आले आहे.