Pahalgam Terror Attack:जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सरकारने दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. यादरम्यान पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. तसेच, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
राज्य तपास संस्थेने (SIA) एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, जम्मू-काश्मीर पोलिस काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी सहकाऱ्यांवर आणि ओव्हरग्राउंड वर्कर्सवर लक्ष ठेवून आहेत. गुप्तचर यंत्रणेने उघड केले आहे की, काश्मीरमधील अनेक स्लीपर सेल पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकांच्या थेट संपर्कात होते आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल इत्यादी मेसेजिंग अॅप्सद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती पुरवत होते.
असेही सांगितले जात आहे की, हे स्लीपर सेल लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कमांडर्सच्या आदेशानुसार ऑनलाइन कट्टरपंथी प्रचारात देखील सहभागी होते. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. यावर राज्यातील सुरक्षा यंत्रणा तीव्र कारवाई करत आहेत.