Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून, तेथे आश्रयास असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए -तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यात थेट सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच कर्नाटकच्या एका मंत्र्याने युद्धासाठी पाकिस्तानात जायची तयारी दर्शवली आहे.
लष्कर-ए-तोयबा, आयएसआय आणि आर्मीच्या मदतीने हल्ल्याचे नियोजन केले होते. हाशमी मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई हे या हल्ल्याचे मुख्य हँडलर होते. ते दोघेही पाकिस्तानी नागरिक आहेत. हे दोघे सीमेपलीकडून नियंत्रकांशी संपर्कात होते आणि हल्ल्याची वेळ, साधने आणि योजना यासंबंधी सूचना घेत होते. दुसरीकडे, भारतावर दबाव टाकून पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, अशा विनवण्या आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सौदी अरेबिया यासह मुस्लिम देशांना करायला सुरुवात केल्याचे समजते. यातच कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद खान यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.
मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार
एका पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना जमीर अहमद खान म्हणाले की, आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिलेला आहे. जर पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि केंद्र सरकारने परवानगी दिली तर युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे. मी युद्धासाठी पाकिस्तानात जाईन. मोदी, शाह यांनी मला आत्मघातकी बॉम्ब द्यावा. मी माझ्या शरीरावर बांधेन आणि पाकिस्तानात जाऊन त्यांच्यावर हल्ला करेन, असे खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खान यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. हा हल्ला निष्पाप नागरिकांविरोधातील घृणास्पद आणि अमानवी कृत्य आहे. प्रत्येक भारतीयाने एकजूट दाखवली पाहिजे. केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याचे आवाहन खान यांनी केले.