नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यात सिंधु जल कराराला स्थगिती देत भारताने पाकचे कंबरडे मोडले आहे. त्यानंतर आता पुन्हा भारताने पाकिस्तानला दणका दिला आहे. भारतानं पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटीस टू एअरमन(NOTAM) जारी करत ३० एप्रिल ते २३ मे या कालावधीत पाकिस्तानचं कुठलेही विमान अथवा लढाऊ विमाने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकत नाही.
पाकिस्तानने भारतीय विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घातल्यानंतर भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस बंद केले आहे. नोटीस टू एअरमननुसार, भारताने ३० एप्रिल ते २३ मे २०२५ या काळात देशाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी प्रवासी विमान, लष्करी विमानांना बंदी आणली आहे. नोटीस टू एअर मिशन सिस्टम अशी व्यवस्था आहे ज्याच्या मदतीने फ्लाईटमध्ये असणाऱ्या केबिन क्रूला महत्वाच्या सूचना पाठवल्या जातात. विमानातील पायलटला हवामान, विस्फोट, हवाई क्षेत्रात बंदी, पॅराशूट जंप, रॉकेट लॉन्च आणि सैन्य सराव सारखी संवेदनशील माहिती या नोटीस टू एअरमनमार्फत पाठवली जाते.
पाकिस्तानींसाठी NO ENTRY
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानविरोधात लष्कर, नौदल आणि हवाई दलाला कारवाई करण्याची मुभा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार पाकिस्तानी लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यातून शोधून शोधून त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. पाकिस्तानसाठी भारताने त्यांचे रस्ते बंद केलेत. भारतीय सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना NO ENTRY आहे.
दरम्यान, पाकिस्तानी उपपंतप्रधान यांनी पुढील ३६ तासांत युद्ध होण्याचा दावा केला आहे. उपपंतप्रधान इशाक डार यांनी मोठ्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला असून तो चुकीचा नसेल असं म्हटलं आहे. ३६ तासांत भारत पाकिस्तानवर हल्ला करू शकते असं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही माध्यमांशी बोलताना वेळेसोबत तणाव आणखी वाढत चालला आहे. कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनेक देश हा संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देईल असं त्यांनी म्हटलं आहे.