जमू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला करून सुमारे २६ जणांची हत्या केल्याने देशासह जगभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे काश्मिरमध्ये सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून, कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच आटोपून मायदेशी परतले आहे.
पंतप्रधान मोदींचं आज सकाळी दिल्लीतील विमानतळावर आगमन झालं. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी विमानतळावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. तत्पूर्वी पहलगाममध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी सौदी अरेबियात पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांनी तिथूनच परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांच्यात झालेल्या भेटीमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही चर्चा झाली. तसेच सौदीच्या क्राऊन प्रिंस यांनी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
मंगळवारी दोन दिवसांच्या सौदी दौऱ्यासाठी जेद्दा येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील हल्ल्यानंतर काश्मिरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सौदीच्या क्राऊन प्रिंससोबतची बैठक दोन तास लांबवली. दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून, २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे.