पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आज आठवडा उलटला आहे. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट व्यक्त होत आहे. तसेच दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. स्वत: मोदी सुरक्षा दलांकडून याबाबत खडानखडा माहिती मिळवत आहेत. तसेच आता पुढे काय कारवाई करायची याची आखणी करण्यासाठी केंद्र सरकार बुधवारी महत्त्वपूर्ण बैठका घेणार आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकापाठोपाठ एक चार बैठका घेणार असून, त्यात काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता सर्वप्रथम कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. या बैठकीत संरक्षणविषयक तयारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर आठवडाभरात दुसऱ्यांदा या समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीपीएची बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी, सर्वानंत सोनोवाल आदी मंत्री सहभागी होतील.
त्यानंतर बुधवारी होणारी तिसरी मोठी बैठक ही कॅबिनेटच्या आर्थिक विषयक समितीची असेल. त्यानंतर कॅबिनेटची बैठक होईल. पहलगाममधील हल्ल्यानंतर होणारी ही कॅबिनेटची पहिलीची बैठक असेल. या बैठकीत संरक्षण विषयक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर इतर विषयांवर चर्चा होईल. त्यानंतर पुढील रणनीतीबाबत काही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.