जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील संबंध ताणले आहेत. भारताने पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, आता संयुक्त राष्ट्रमध्येही भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानला वाईट राष्ट्र म्हणून संबोधले आहे.
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला 'दुष्ट राज्य' म्हटले आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी राजदूत योजना पटेल म्हणाल्या की, एका विशिष्ट शिष्टमंडळाने भारताविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि निराधार आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा गैरवापर करणे दुर्दैवी आहे.
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
" काही दिवसापूर्वी जगाने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा, प्रशिक्षण देण्याचा आणि निधी देण्याचा पाकिस्तानचा इतिहास कबूल करताना ऐकले आहे. ही त्यांची उघड कबुली आहे आणि पाकिस्तानला जागतिक दहशतवादाला प्रोत्साहन देणारा आणि प्रदेश अस्थिर करणारा एक दुष्ट देश म्हणून उघड करते. जग आता डोळे बंद करून राहू शकत नाही, असंही त्यांनी सांगितले.
२६/११ पेक्षा मोठा हल्ला
संयुक्त राष्ट्रांमध्ये योजना पटेल म्हणाल्या की, २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात देशातील नागरिकांचे सर्वात मोठे नुकसान झाले. अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी राहिलेला भारत अशा हल्ल्यांचा बळी, त्यांच्या कुटुंबियांवर आणि समाजावर होणारा दीर्घकालीन परिणाम पूर्णपणे जाणतो.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील नेते आणि सरकारांनी व्यक्त केलेल्या स्पष्ट पाठिंब्याचे आणि एकतेचे भारत कौतुक करतो. त्या म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचा हा एक चांगला परिणाम आहे. जगातील प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला पाहिजे, असंही पटेल म्हणाल्या.
योजना पटेल म्हणाल्या की, दहशतवादामध्ये पीडितांचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी ही एक सुरक्षित जागा आहे. पीडितांचे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी VoTAN सारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे.