Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भयानक हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला होता. विनय नरवाल २६ वर्षांचे होते आणि कोची येथे तैनात होते. लग्नानंतर हनिमूनसाठी पहलगाम येथे गेलेल्या विनय यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर विजय नरवाल यांची पत्नी हिमांशी या बरेच चर्चेत आल्या आहेत. हिमांशीने पहलगाम हल्ल्यानंतर लोकांना मुस्लिम आणि काश्मिरींना लक्ष्य करू नका असे आवाहन केले होते. त्यामुळे नेटकऱ्यांकडून तिला ट्रोल करण्यात आलं. यावरुनच आता हिमांशी नरवाल यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महिला आयोगाने एक निवेदन जारी करत कोणत्याही महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याच्या आधारे ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटलं.
विनय नरवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १ मे रोजी त्यांच्या कुटुंबियांनी करनाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी हिमांशीने हल्ल्यानंतर सुरु असलेल्या हिंदू मुस्लीम वादावर प्रतिक्रिया दिली होती. काही राज्यांमध्ये काश्मिरींना लक्ष्य केले जात असल्यावरुन तिला प्रश्न विचारण्यात आला होता. "आम्हाला हिंदू-मुस्लिमच्या नावाखाली द्वेष पसरवायचा नाही. आम्हाला लोक मुस्लिम आणि काश्मिरींच्या विरोधात जावेत असं अजिबात वाटत नाही. आम्हाला हे नको आहे. आम्ही फक्त आणि फक्त सर्वांना शांततेचे आवाहन करतो," असे हिमांशीने म्हटलं होतं. हिमांशीच्या या विधानानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले.
हिमांशीच्या या विधानामुळे सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली. ज्यांनी तिला एका आठवड्यापूर्वीच पाठिंबा दिला तेच हिमांशीवर जोरदार टीका करत होते. एका नेटकऱ्याने म्हटलं की हिमांशी असे विधान करुन या घटनेचा वापर सामाजिक आणि राजकारणात जाण्याची संधी म्हणून करत आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिचा विचार कशामुळे बदलला असा प्रश्न विचारला आहे. आणखी एका युजरने तिला गोळी मारायला हवी होती, असं म्हटलं आहे. काहींनी हल्ल्यानंतरच्या व्हिडिओंमध्ये ती इतकी स्थिर कशी असू शकते असं म्हटलं. तर काहींनी तिला या घटनेचा धक्काच बसला नाही असेही म्हटलं. एका युजरने असे वाटते की हिमांशी या कटाचा भाग होती. सुरक्षा यंत्रणांनी तिची पार्श्वभूमी तपासली पाहिजे, अशी कमेंट केली.
हिमांशी नरवाल यांच्या विधानावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, महिला आयोगाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी केले. "शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या शहीद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्यावर झालेली टीका दुर्दैवी आहे. हिमांशीच्या विधानाशी सर्वजण सहमत नसतील. परंतु असहमती व्यक्त करण्याची पद्धत संविधानाच्या कक्षेत आणि सभ्य पद्धतीने असली पाहिजे. अशा वेळीही कोणत्याही महिलेला ट्रोल करणे योग्य नाही. प्रत्येक महिलेची प्रतिष्ठा मौल्यवान आहे," असं महिला आयोगाने म्हटलं.