Pahalgam Attack News: काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नागरिकांना अचानक घेरून दहशतवाद्यांनी अमानुषपणे जीव घेतले. तब्बल २६ पर्यटकांचा यात मृत्यू झाला. या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केल्या, त्यातील एकाचा फोटो आता समोर आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दहशतवाद्याचा जो फोटो समोर आला आहे, तो ज्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली, तिथला आहे. या दहशतवाद्याच्या हातात रायफल आणि डोक्यावर टोपी आहे. त्याच्या पाठीमागच्या बाजूने हा फोटो काढण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाही.
लष्कराने हाती घेतली शोध मोहीम
पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहीम हाती घेतली आहे. या घटनेनंतर एनआयएचे पथकही श्रीनगरला पोहोचले आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने होते. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले जात आहे.
वाचा >>काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
सध्या लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षाही वाढवण्यात आली असून, सध्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
एनआयएच्या पथकाने काश्मीर खोऱ्यात पोहोचल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकांचे मृतदेह पहलगाम येथील रुग्णालयातून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत.