Robert Vadra On Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या हल्ल्यानंतर विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी भाजपवर टीका करत आहेत. अशातच आता या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, या हल्ल्यात प्राण गमावलेल्या 28 लोकांना मी श्रद्धांजली वाहतो. पण, देशातील सद्याच्या वातावरणामुळे हा हल्ला झाल्याचे मला वाटते. मुस्लिमांना मशिदींमध्ये नमाज अदा करण्यापासून रोखले जाणे किंवा मूर्ती शोधण्यासाठी मशिदींचे सर्वेक्षण करणे, यामुळे अशाप्रकारचा हल्ला झाला आहे. आपल्याला दाबले जातेय, अशी भावना देशातील मुस्लिमांमध्ये आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे, माझ्या कुटुंबाचे किंवा काँग्रेसचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
वाड्रा पुढे म्हणतात, तुम्ही बाबर आणि औरंगजेाचा विषय आणता, त्यामुळेही मुस्लिम समाज दुखावला जातो. या मुद्द्यावर राजकारण होणे आणि त्यांच्यावर विविध निर्बंध लादले जाणे, हे योग्य नाही. धर्म आणि राजकारण वेगळे असले पाहिजे. जर हे थांबवले नाही, तर अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले होतच राहतील. पहलगाममध्ये नाव-धर्म पाहून गोळ्या झाडल्या, हे चुकीचे आहे. मी याचा तीव्र शब्दात निषेध करतो.
वाड्रा पुढे म्हणतात, देशात सरकार हिंदुत्वाबद्दल बोलते, तेव्हा अल्पसंख्याकांना अस्वस्थ वाटते. देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट निर्माण झाली आहे. जोपर्यंत आपण एकजूट आणि धर्मनिरपेक्ष राहणार नाही, तोपर्यंत आपल्या कमकुवतपणा आणि अंतर्गत समस्या आपल्या शत्रूंना स्पष्टपणे दिसून येतील. दहशतवादाविरोधात समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, तो मानवतेवर थेट हल्ला आहे, असेही वाड्रांनी यावेळी म्हटले.