पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानींना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. तर त्याला प्रत्यूत्तर म्हणून पाकिस्ताननेहीभारतीय नागरिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. परंतू, मुख्य अडचण माहेरवाशिनींची झाली आहे. भारतात सासर, पाकिस्तानात माहेर किंवा पाकिस्तानात सासर, भारतात माहेर असलेल्या अनेकजणी आपापल्या माहेरी आलेल्या होत्या. त्यांना सगळे आवरून मुलांना घेऊन वाघा किंवा अटारी बॉर्डर गाठावी लागत आहे.
कराचीला दिलेली जोधपूरची महिला यामुळे त्रस्त झाली आहे. आम्हाला ४८ तासांत जाण्यास सांगितले आहे. हे कसे शक्य आहे. अटारी हे जोधपूरपासून ९०० किमी दूर आहे. आम्हाला बस मिळत नाहीत. माझ्या पतीला तिकिटांसाठी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. २७ तारखेला जाणार होतो. परंतू, या हल्ल्यामुळे आता जावे लागत आहे. माझा पासपोर्ट भारतीय आहे, परंतू मी अर्धी पाकिस्तानी आहे. दहशतवाद्यांना अल्ला शिक्षा देईल, पण यात आमची काय चूक, आमच्यासारख्या लग्न होऊन गेलेल्यांसाठी एक पर्याय खुला ठेवावा, अशी दोन्ही सरकारांना विनंती करत असल्याचे या महिलेने सांगितले.
तर दिल्लीत माहेरी आलेल्या महिलेने तिची आपबिती सांगितली आहे. सादिया अल्वी ही भारतीय आहे, तिचे कराचीतील मुलाशी लग्न झाले आहे. सादिया म्हणते, माझ्याकडे भारतीय पासपोर्ट आहे, त्यावरचा व्हिसा संपला आहे. तर माझ्या पाच वर्षांच्या मुलाकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. मी पाकिस्तानात जाऊ शकत नाही, मुलाला एकटे कसे पाठवू, असा सवाल तिने केला आहे. पाकिस्तानी एम्बेसीमध्ये गेलेली परंतू ती बंद आहे. सरकारने याचा विचार करावा व मला व्हिसा द्यावा जेणेकरून मी मुलासह पतीच्या घरी जाऊ शकेन, असे सादिया म्हणत आहे.
असाच प्रकार पाकिस्तानात गेलेल्या महिलांच्या बाबत घडला आहे. तिकडून भारतात येण्यासाठी त्या निघाल्या आहेत, परंतू वाघा बॉर्डर बंद असल्याने परत माघारी फिरावे लागले आहे. सिंध प्रांतातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या लोकांवर या निर्णयाचा परिणाम होत आहे. १५ वर्षांची मुलगी तिकडे १० वी ची परीक्षा देण्यासाठी गेली होती, ती देखील आता तिथे अडकली आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचे कुटुंब धार्मिक अत्याचाराला कंटाळून भारतात आले होते.