गुजरातमधील भावनगर येथे राहणारा सावन परमार आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यामुळे खूप दुःखी झाला आहे. त्याने सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सावन परमारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वडील आणि भाऊ गमावला आहे. "माझ्या भावाला गोळी लागली, मला तो परत आणून द्या आणि मग पाकिस्तानशी मॅच खेळा..." असं सावन परमारने म्हटलं आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना असल्याने कुटुंबीय खूश नाहीत. पहलगाम हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात गुजरातमधील भावनगर येथील सुमित परमार आणि त्याचे वडील यतिश परमार यांचा समावेश होता. सावन परमार म्हणाला की, "पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याने त्याच्याशी कोणतेही व्यवहार होऊ नये."
"BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
"माझा १६ वर्षांचा भाऊ परत आणून द्या"
"जर तुम्हाला पाकिस्तानसोबत सामना खेळायचा असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा १६ वर्षांचा भाऊ परत आणून द्या. ऑपरेशन सिंदूर हे भारत सरकारने केलं होतं, जर सामना झाला तर हे व्यर्थ होईल. एकूणच, पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार व्हायला नकोत." भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याला अनेक लोकांनी विरोध केला आहे.
"आमच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत"
पती आणि मुलगा गमावलेल्या किरण परमार म्हणाल्या की, "हा सामना होऊ नये. मी पंतप्रधान मोदींना विचारू इच्छिते की, जर ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, तर हा भारत-पाकिस्तान सामना का होत आहे? मी संपूर्ण देशाला सांगू इच्छितो की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांना भेटा आणि ते किती दुःखी आहेत ते पाहा. आमच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत..."