पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसीवर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय, अमेरिकेच्या पेंटागॉनचा माजी अधिकारी सांगतोय इस्रायलसारखा बदला घ्या... अशातच बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची तिकडे एलओसीवर वाट पाहत आहे. हा आदेश सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक, नाहीतर बीएसएफच्या जवानांना इच्छा नसूनही बीटिंग रिट्रीट सेरेमनी करावी लागणार आहे.
केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतू लवकरच आदेश जारी केला जाईल असे सांगितले जात आहे. यापूर्वीही भारत सरकारने बीटिंग रिट्रीट सेरेमनी दोनवेळा बंद केलेली आहे. पहलगाम हल्ल्यामुळे आता ही पुन्हा बंद केली जाण्याची शक्यता आहे. दररोज सूर्यास्तापूर्वी सीमेवर एक बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित केला जातो. यात भारतीय आणि पाकिस्तानी सैनिक आपापल्या देशाचे ध्वज नाट्यमयरित्या खाली घेतात, एकमेकांसमोर आपली ताकद दाखविली जाते. हे पाहण्यासाठी दोन्ही बाजुंनी मोठ्या प्रमाणावर पर्यटक उपस्थित असतात.
भारत सरकारने या हल्ल्यानंतर अटारी येथील चेक पोस्ट बंद केले आहे. ज्या लोकांना १ मे २०२५ पूर्वी परतण्याची परवानगी मिळालेली आहे, त्यांच्यासाठीच हे गेट उघडले जाणार आहे. वाघा सीमेवर होणारा बीटिंग रिट्रीट समारंभ देखील थांबवला जाण्याची शक्यता आहे. अजून केंद्राकडून कोणताही आदेश आलेला नसला तरी पर्यटकांना बीटिंग रिट्रीट समारंभ बंद केला जाणार असल्याचे वाटत आहे.
बीएसएफ वाट पाहतेय...
आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत. बीटिंग रिट्रीट समारंभ थांबवण्याचा आदेश लवकरच जारी केला जाईल, असे आम्हाला सांगितले जात आहे, असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अमृतसर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने देखील आपल्याला समारंभ थांबविम्याबद्दल किंवा अटारीला जाणाऱ्या पर्यटकांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे सांगितले. २०१४ मध्ये वाघा येथे झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटानंतर आणि २०१९ मध्ये भारतीय वैमानिक अभिनंदनला पकडल्यानंतर हा समारंभ थांबवण्यात आला होता.