पूरग्रस्तांना मोदींनी दिले ७४० कोटींचे पॅकेज
By Admin | Updated: October 24, 2014 03:39 IST2014-10-24T03:33:49+5:302014-10-24T03:39:01+5:30
श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले

पूरग्रस्तांना मोदींनी दिले ७४० कोटींचे पॅकेज
श्रीनगर : श्रीनगरमधील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू - काश्मीरमध्ये गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूरग्रस्तांसाठी ७४० कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले. हॉस्पिटलसाठी १७० कोटी तर घरांच्या बांधणीसाठी ५४० कोटी रूपये केंद्र सरकार उपलब्ध करणार असल्याची घोषणा मोदी यांनी केल्याने जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्तांना वेगळी दिवाळी भेट मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौ-यावर काँग्रेसने टीका केली असून हा सर्व पब्लिसिटी स्टंट असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मोदी यांनी आज सियाचीनमधील जवानांचीही भेट घेतली. भारतातील प्रत्येक नागरिक तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत आहे असे आश्वासनही मोदींनी या जवानांना दिले. दिवाळीनिमित्त श्रीनगरमध्ये आलेल्या मोदींनी गुरुवारी सकाळी सियाचीनमधील जवानांसोबत काही काळ घालवला. बिकट स्थितीतही देशाची रक्षा करणाऱ्या या जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, केवढीही उंची असो किंवा थंडी, आमच्या जवानांना कोणीच रोखू शकत नाही. ते जिथे उभं राहून भारताची सेवा करतात त्याचा प्रत्येकाला गौरव वाटतो. जवानांशी संवाद साधल्यावर मोदी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी श्रीनगरमध्ये आले.
या दौ-यासाठी येण्यापूर्वी मोदींनी ट्विटरद्वारे त्यांच्या भावना मांडल्या. सियाचीनमध्ये कार्यरत असलेल्या शूरवीर जवानांसोबत वेळ घालवणे ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)