मुंबई - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासंदर्भात माहिती देत देशवासीयांना संबोधित केले. कोरोनासारख्या एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. यापूर्वी आम्ही असे संकट ना पाहिले किंवा ऐकलेही नाही. हे कल्पनेपलिकडचे आहे. एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे. म्हणून, एकच मार्ग आहे, स्वावलंबी भारत. शास्त्रामध्येही हेच सांगितले आहे, असे म्हणत मोदींनी चौथ्या लॉकडाऊनसंदर्भातही संकेत दिले आहेत. तसेच, देशातील नागरिकांसाठी २० लाख कोटींच्या पॅकेजचीही घोषणा केली. मात्र, गावाकडे, घराकडे वापस जाणाऱ्या मजुरांच्या आत्ताच्या परिस्थितीसंदर्भात मोदी काहीच बोलले नाहीत. यावरुन काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे.
कोरोनामुळे जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे आप्तजण गमावले आहेत. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय, ना ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे, असे मोदींनी सांगितले. तसेच मोदींनी जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेजची घोषणा केली. म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकांसाठी, मजूरांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच भारतीयांसाठी मोदींनी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर, चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संदर्भातही मोदींनी महत्वाची सूचना केली.
याचबरोबर मी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो. स्वावलंबी भारत मोहिमेसाठी हे पॅकेज काम करेल. गेल्या काळात आर्थिक पॅकेज दिले होते. त्याला आणि आजच्या पॅकजला जोडले तर जवळपास २० लाख कोटी रुपयांचे आहे. भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग, यासाठी हे पॅकेज आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक आणि शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळए होत असलेल्या स्थलांतरीत मजूर, कामगारांच्या सद्यपरिस्थितीबाबत मोदींनीही काहीही वक्तव्य केले नाही. यावरुन काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत मोदी सरकार असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे.
देशभरात स्थलांतरीत करत असलेल्या मजूर, कामगार, गरिब वर्गातील नागरिकांना सर्वात प्रथम मदत मिळणे गरजेचं आहे. आज आपण या कामगारांसाठी काहीतरी पॅकेज जाहीर कराल, अशी आशा होती. देश आणि राष्ट्रनिर्मित्तीसाठी कार्यरत असलेल्या मजूर आणि कष्टकरी बांधवांप्रति आपली निष्ठुरता आणि असंवेदनशीलता निराशाजनक असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तसेच, मोदींनी जे पॅकेज जाहीर केलं ते सत्यात उतरण्याची वाट पाहात आहोत, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.